Skip to main content
Date
City
Mumbai

पंचायत समित्यांच्या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आणि कोट्यधीश असलेले नेते अधिक संख्येने निवडून आल्याचे सर्वेक्षण "एडीआर' या स्वयंसेवी संस्थेने केले आहे.

असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि "महाराष्ट्र इलेक्‍शन वॉच' या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले 187 उमेदवार निवडून आले असून, कोट्यधीश असलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या 499 आहे. उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. ज्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, महिलांच्या विनयभंगाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दरोडा, चोरी, दादागिरी, फसवणूक आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी 2990 उमेदवारांपैकी 2868 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्‍लेषण या संस्थांनी केले आहे. 25 जिल्ह्यांमध्ये 16 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी 2017 रोजी दोन टप्प्यांत 283 पंचायत समित्यांची निवडणूक झाली. यात हे उमेदवार निवडून आले आहेत. हा अहवाल तयार करेपर्यंत बाकीची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली नव्हती. त्यामुळे त्यांचे विश्‍लेषण करण्यात आले नाही.

एकूण 2868 विजयी उमेदवारांपैकी तीन विजयी उमेदवारांनी आपल्यावर खून आणि 18 उमेदवारांनी आपल्यावर खुनाचा प्रयत्न करणे यासारखे प्रकरण घोषित केले आहे. दोन विजयी उमेदवारांनी आपल्यावर बलात्कार आणि आठ विजयी उमेदवारांनी आपल्यावर महिलांच्या विनयभंगाचा प्रयत्न करणेसारखे प्रकरण घोषित केले आहे. भाजपच्या 807 विजयी उमेदवारांपैकी 42 (5 टक्के), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 641 विजयी उमेदवारांपैकी 57 (9 टक्के), शिवसेनेच्या 563 विजयी उमेदवारांपैकी 45 (8 टक्के) आणि कॉंग्रेसच्या 558 विजयी उमेदवारांपैकी 22 (4 टक्के) विजयी उमेदवारांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. भाजपच्या 807 विजयी उमेदवारांपैकी 36 (5 टक्के), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 641 विजयी उमेदवारांपैकी 47 (7 टक्के), शिवसेनेच्या 563 विजयी उमेदवारांपैकी 35 (6 टक्के) आणि कॉंग्रेसच्या 558 विजयी उमेदवारांपैकी 18 (3 टक्के) विजयी उमेदवारांनी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

पक्षवार कोट्यधीश उमेदवार
विजयी 2868 उमेदवारांपैकी 499 उमेदवार कोट्यधीश असल्याचे अहवालात नमूद केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 641 विजयी उमेदवारांपैकी 154 (24 टक्के), भाजपच्या 807 विजयी उमेदवारांपैकी 110 (14 टक्के), शिवसेनेच्या 563 विजयी उमेदवारांपैकी 96 (17 टक्के) आणि कॉंग्रेसच्या 558 विजयी उमेदवारांपैकी 89 (16 टक्के) विजयी उमेदवार कोट्यधीश आहेत.

भाजपचे गुलाबराव गोविंद म्हाळस्कर (वडगाव मावळ पंचायत समिती) हे सर्वांत धनवान आहेत. त्यांनी 39 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. या निवडणुकीताल नऊ विजयी उमेदवारांनी त्यांची मालमत्ता शून्य असल्याचे घोषित केले आहे. 2868 पैकी 285 (10 टक्के) विजयी उमेदवारांनी (शून्य मालमत्ता घोषित करणारे उमेदवार सोडून) त्यांची मालमत्ता तीन लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे घोषित केले आहे. गिरावीतून (फलटण पंचायत समिती) निवडणूक जिंकलेल्या कॉंग्रेसचे उमेदवार जयश्री दिगंबर अगवाणे यांनी सात कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचे घोषित केले आहे.

विजयी प्रतिनिधींची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी
 गुन्हेगारी प्रकरणे असलेले उमेदवार - 187 (7 टक्के)
 गंभीर गुन्हेगारी प्रकरण असलेले उमेदवार - 150 (5 टक्के)

विजयी प्रतिनिधींची आर्थिक पार्श्‍वभूमी
 कोट्यधीश उमेदवार - 499 (17 टक्‍के)
 सरासरी मालमत्ता - 75 लाख रुपयांपेक्षा जास्त