Skip to main content
Source
Dainik Prabhat
https://www.dainikprabhat.com/adr-report-says-7-electoral-trusts-received-258-crore-rupees-in-donation-bjp-got-82-percent-money/
Author
प्रभात वृत्तसेवा
Date
City
New Delhi

एडीआर अहवालानुसार (असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स), 2020-21मध्ये सात निवडणूक ट्रस्टना कॉर्पोरेट्स आणि इतर व्यक्तींकडून एकूण 258.49 कोटी रुपये देणगी मिळाली आहेत. यातील 82 टक्क्यांहून अधिक रक्कम भाजपच्या खात्यात आली आहे. निवडणूक ट्रस्ट ही ना-नफा संस्था आहे. याद्वारे, राजकीय पक्षांना कॉर्पोरेट संस्था आणि व्यक्तींकडून आर्थिक योगदान मिळते. निवडणुकीशी संबंधित खर्चासाठी पैशाच्या वापरात पारदर्शकता आणणे हा या प्रणालीचा उद्देश आहे.

गुरुवारी समोर आलेल्या ताज्या एडीआर अहवालात म्हटले आहे की, 23 पैकी 16 निवडणूक ट्रस्टने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय निवडणूक आयोगाला मिळालेल्या देणग्यांचे तपशील शेअर केले आहेत. यापैकी केवळ सात ट्रस्टने देणग्या घेतल्याचे सांगितले आहे. अहवालानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात ज्या सात निवडणूक ट्रस्टला देणग्या मिळाल्याचे सांगण्यात आले आहे, त्यांना कॉर्पोरेट्सकडून 258.49 कोटी देणग्या मिळाल्या आहेत आणि यापैकी 258.43 कोटी विविध राजकीय पक्षांना वितरित करण्यात आले आहेत.’

एकट्या भाजपला 212 कोटी –
यापैकी केंद्रातील सत्ताधारी भाजपला 212.05 कोटी रुपये मिळाले आहेत, जे एकूण रकमेच्या 82.05 टक्के आहेत. त्याचवेळी बिहारमध्ये भाजपसह राज्यात सत्तेत असलेल्या जनता दल युनायटेडला (जेडीयू) 27 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय इतर 10 राजकीय पक्षांना निवडणूक ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांपैकी एकूण 19.38 कोटी रुपये मिळाले आहेत. या पक्षांमध्ये काँग्रेस, एनसीपी, अन्नाद्रमुक, द्रमुक, राजद, आप, लोजप, सीपीएम, सीपीआय आणि लोकतांत्रिक जनता दल यांचा समावेश आहे.