Source: 
Author: 
Date: 
27.11.2016
City: 

राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्येही श्रीमंत उमेदवारांचा बोलबाला सुरू आहे. महाराष्ट्र इलेक्शन वॉच व असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर)ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये तब्बल १२५० उमेदवारांकडे १ कोटीपेक्षा जास्त मालमत्ता आहे. सातारा नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतीकाराजे शिवेंद्रसिंह भोसले या सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडे ७१ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांप्रमाणेच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही आर्थिक निकषावरच उमेदवारी दिली जात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.

महाराष्ट्र इलेक्शन वॉच व असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक

रिफॉर्म (एडीआर) या संस्था देश

व राज्यातील विविध निवडणुकांमधील उमेदवारांची आर्थिक, शैक्षणिक

व गुन्हेगारी विषयी सर्वेक्षण करण्याचे काम करत आहेत.

या संस्थांनी राज्यातील १९ जिल्ह्यांतील जवळपास ११२ नगरपालिका निवडणुकांमधील १२,७१२ उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र अभ्यासून अहवाल तयार केला.

उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या माहितीवर आधारित या अहवालामध्ये नगरपालिका निवडणुकांमध्येही श्रीमंतांनाच उमेदवारी दिल्याचे स्पष्ट होत आहे. तब्बल १२५० उमेदवारांनी त्यांच्याकडे १ कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. यामध्ये जमीन, दागिने व इतर मालमत्तांचा समावेश आहे.

निवडणूक लढविणाऱ्या ४८९ उमेदवारांकडे स्वत:चे घर, बँकबॅलन्स व इतर काहीही मालमत्ता नसल्याची नोंद केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज साताराचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतीकाराजे भोसले सातारा नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.

त्यांच्याकडे ७१ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता आहे. राज्यात सर्वाधिक संपत्ती त्यांच्याकडे असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. त्यांच्यानंतर अलिबाग नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे उमदेवार प्रशांत मधुसुदन नाईक यांच्याकडे ४५ कोटी १७ लाख रुपयांची मालमत्ता आहे.

बहुतांश प्रमुख पक्षांनी व आघाड्यांनी उमेदवार निवडताना त्याच्या जनसंपर्काबरोबर आर्थिक स्थितीलाही प्राधान्य दिले असल्याचे या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले असून प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले उमेदवार जिंकणार की इतर सामान्य उमेदवारांनाही संधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वाधिक श्रीमंत दहा उमेदवार

नाव संपत्ती नगरपालिका

वेदांतीकाराजे शिवेंद्रसिंह भोसले ७१ कोटी ७९ लाख सातारा

प्रशांत मधुसुदन नाईक ४५ कोटी १७ लाख अलिबाग

नयनकुमार जितेंद्रसिंह रावल ४३ कोटी ६१ लाख धोंडीचा वरवडे

मधुबाला दिलीपसिंह भोसले ४० कोटी ९० लाख फलटण

पुष्पा तुकाराम साबळे ४० कोटी ५१ लाख खोपोली

अनीता शिरीष चौधरी ३८ कोटी ३२ लाख अमळनेर

रघुनाथराजे निंबाळकर ३७ कोटी २८ लाख फलटण

प्रसन्न कुबल २८ कोटी ७१ लाख वेंगुर्ले

माधुरी देशमुख २४ कोटी २ लाख शेगाव

रवींद्र क्षीरसागर २६ कोटी २३ लाख दापोली

- बहुतांश प्रमुख पक्षांनी जनसंपर्काबरोबर आर्थिक स्थितीलाही प्राधान्य दिले असल्याने प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले उमेदवार जिंकणार की इतर

सामान्य उमेदवारांनाही संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

© Association for Democratic Reforms
Privacy And Terms Of Use
Donation Payment Method