Source: 
Loksatta
https://www.loksatta.com/desh-videsh/bjp-congress-income-in-crores-for-year-of-2022-23-rahul-gandhi-party-spent-more-money-than-income-bhartiya-janata-party-expenses-svs-99-4234808/
Author: 
ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Date: 
29.02.2024
City: 

Six National Parties Income & Expense: सहा राष्ट्रीय पक्षांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे ३०७७ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न घोषित केले आहे. या पक्षांचे खर्च व मिळकतीचे आकडे सध्या समोर आले आहेत, त्यावर एक नजर टाकूया..

Six National Parties Income & Expense: सहा राष्ट्रीय पक्षांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे ३०७७ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न घोषित केले आहे, ज्यामध्ये भाजपाने सर्वाधिक २३६१ कोटी रुपये कमावल्याचे समजतेय. याबाबत पीटीआयने असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या हवाल्याने माहिती दिली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सत्ताधारी भाजपचे उत्पन्न सहा राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या ७६.७३ टक्के राहिले आहे. तर काँग्रेसने ४५२.३७५ कोटी रुपयांसह दुसरे सर्वोच्च उत्पन्न जाहीर केले आहे. काँग्रेसची मिळकत ही सहा राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या १४. ७० टक्के आहे. भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त, बसपा, आप, एनपीपी आणि सीपीआय-एम यांनीही त्यांचे उत्पन्न जाहीर केले आहे.

२०२२ – २३ मध्ये राष्ट्रीय पक्षांनी किती कोटी कमावले?

आर्थिक वर्ष २०२१-२२ आणि २०२२ -२३ दरम्यान, भाजपचे उत्पन्न २३. १५ टक्क्यांनी म्हणजे साधारण ४४३.७२४ कोटी रुपयांनी वाढले आहे जे आर्थिक वर्ष २०२१ -२२ मधील १९१७.१२ कोटी रुपयांवरून २०२२- २३ या आर्थिक वर्षात २३६०. ८४४ कोटी रुपये झाले आहे.

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या नोंदी व पीटीआयच्या हवाल्याने द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, २०२१ -२२ आणि २०२२ -२३ या आर्थिक वर्षात काँग्रेस, CPI(M) आणि BSP च्या उत्पन्नात अनुक्रमे १६.४२ टक्के (रु. ८८.९० कोटी), १२.६८ टक्के (रु. २०.५७५ कोटी) आणि ३३.१४ टक्के (१४.५०८ कोटी) घट झाली आहे. दुसरीकडे, केजरीवाल यांच्या ‘आप’चे उत्पन्न आर्थिक वर्ष २०२१ -२२ मध्ये ४४.५३९ कोटी रुपयांवरून ९१.२३ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २०२२ -२३ मध्ये ८५. १७ कोटी रुपये झाले आहे.

मिळकतीपेक्षा काँग्रेसचा खर्च जास्त, तर भाजपाने फक्त..

दरम्यान, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भाजपने २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण २३६०.८४४ कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित केले असले तरी त्यातील केवळ ५७.६८ टक्के म्हणजेच साधारण १३६१.६८४ कोटी रुपये खर्च केले आहेत.

तर काँग्रेसचे एकूण उत्पन्न ४५२.३७५ कोटी रुपये होते, ज्यात खर्च ४६७. १३५ कोटी रुपये इतका होता. म्हणजेच वर्षभरातील काँग्रेसचा खर्च त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा ३. २६ टक्क्यांनी जास्त होता. दुसरीकडे, सीपीआय(एम) चे एकूण उत्पन्न १४१.६६१ कोटी रुपये होते तर त्यांचा खर्च १०६.०६७ कोटी रुपये होता, जो त्यांच्या उत्पन्नाच्या ७४.८७ टक्के होता. आपचे उत्पन्न सुद्धा ८५. १७ कोटी रुपये होते पण खर्च १०२.०५१ कोटी रुपये होता जो एकूण उत्पन्नाच्या १९.८२ टक्के जास्त होता.

© Association for Democratic Reforms
Privacy And Terms Of Use
Donation Payment Method