Skip to main content
Source
Saam TV
Date
City
New Delhi

कॉर्पोरेट आणि व्यावसायिक घराण्यांनी 2019-20 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांना तब्बल 921.95 कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. ज्यामध्ये भाजपला (BJP) सर्वाधिक 720.407 कोटी रुपये मिळाले आहेत, असे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. आर्थिक वर्ष 2017-18 आणि 2018-19 दरम्यान कॉर्पोरेट्सकडून (corporates) राष्ट्रीय पक्षांना (national political parties) मिळणाऱ्या देणग्या सुमारे 109 टक्क्यांनी वाढल्या आहेत. निवडणुकीच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी काम करणाऱ्या 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR)' या एनजीओने केलेल्या विश्लेषणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या तपशिलांच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आले. (BJP Got Highest Corporate Donation Of 720 Crores In 2019-20: Report)

या अहवालात एकुण पाच पक्षांच्या देणग्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यात भारतीय जनता पक्ष (भाजप), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP), ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC) आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (CPM) यांचा समावेश आहे. या अहवालानुसार, भाजपला आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 2,025 कॉर्पोरेट देणगीदारांकडून सर्वाधिक ₹ 720.407 कोटींच्या देणग्या मिळाल्या, त्यानंतर कॉंग्रेसने 154 देणगीदारांकडून एकूण ₹ 133.04 कोटींच्या देणग्या मिळवल्या आणि 36 कॉर्पोरेट देणगीदारांकडून राष्ट्रवादीने ₹ 57.086 कोटी रपये देणगी मिळवली. सीपीएमने 2019-20 साठी कॉर्पोरेट देणग्यांमधून कोणतेही उत्पन्न घोषित केले नाही, असे त्या अहवालात म्हटले आहे.

2019-20 मध्ये प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट (Prudent Electoral Trust) हे भाजप आणि काँग्रेसला सर्वाधिक देणगीदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. ट्रस्टने एकाच वर्षात प्रत्येकी 38 वेळा दोन्ही पक्षांना एकूण ₹ 247.75 कोटींची देणगी दिली. यात भाजपला ₹ 216.75 कोटी आणि कॉंग्रेसला प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून ₹ 31.00 कोटी मिळाल्याचे घोषित केले. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही 2019-20 मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक देणगी देणारी कंपनी होती, असे अहवालात म्हटले आहे.