Skip to main content
Source
ABP Marathi
https://marathi.abplive.com/elections/gujrat-election-2022-association-for-democratic-reforms-adr-report-151-mlas-out-of-182-who-won-in-assembly-elections-are-millionaires-1129572
Author
एबीपी माझा ब्युरो
Date

गुजरातची ही विधानसभा मात्र श्रीमंत विधानसभा म्हणावी लागेल. कारण एडीआर (ADR) रिपोर्टनुसार नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा 2022 निवडणुकीत विजयी झालेल्या 182 आमदारांपैकी एकूण 151 आमदार कोट्यधीश आहेत.

Gujrat Election 2022 : गुजरात विधानसभेची (Gujrat Election)निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपनं (Gujrat BJP) 156 जागा जिंकत दणदणित विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेची चावी आपल्याकडे ठेवली आहे. भूपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गुजरातची ही विधानसभा मात्र श्रीमंत विधानसभा म्हणावी लागेल. कारण एडीआर (ADR) रिपोर्टनुसार नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा 2022 निवडणुकीत विजयी झालेल्या 182 आमदारांपैकी एकूण 151 आमदार कोट्यधीश आहेत. यात विशेष गोष्ट अशी की, ADR ने केलेल्या अभ्यासानुसार, 74 असे आमदार पुन्हा निवडून आले आहेत ज्यांची मालमत्ता सरासरी 2.61 कोटी रुपयांनी वाढली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स  Association for Democratic Reforms (एडीआर)रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. 2017 च्या निवडणुकीत विजयी झालेल्या कोट्यधीश म्हणजे एक कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या आमदारांची संख्या 141 होती. यावेळी विधानसभेवर निवडून आलेले 83 टक्के आमदार कोट्यधीश आहेत. 

या रिपोर्टमधून असं समोर आलं आहे की, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) सर्वाधिक म्हणजे तब्बल 132 आमदार कोट्यधीश आहेत, त्यापाठोपाठ काँग्रेसचे 14, तीन अपक्ष, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाचा प्रत्येकी एक आमदार करोडपती आहे.

गुजरात विधानसभेच्या 182 सदस्यांच्या सभागृहात भाजपने सलग सातव्यांदा गुजरातमध्ये विक्रमी 156 जागा जिंकून विजय मिळवला आहे. यातील 151 कोट्यधीश आमदारांपैकी 73 आमदारांकडे 5 कोटींहून अधिक संपत्ती आहे तर 73 आमदारांकडे 2 कोटी ते 5 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

या रिपोर्टनुसार, गुजरातमधील विजयी उमेदवारांची सरासरी संपत्ती 16.41 कोटी रुपये आहे, जी 2017 च्या 8.46 कोटी रुपयांच्या जवळपास दुप्पट आहे.

भाजपचे मानसाचे आमदार जेएस पटेल हे 661 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत आमदार आहेत. यानंतर भाजपचे सिद्धपूरचे आमदार बलवंत सिंह राजपूत (372 कोटी रुपये) दुसऱ्या स्थानावर आहेत, तर भाजपचे राजकोट दक्षिणचे आमदार रमेश तिलाला (175 कोटी रुपये) तिसऱ्या स्थानावर आहेत.

यंदा निवडून आलेले सहा आमदार पीएचडी मिळवलेले तर 19 आमदार पदव्युत्तर, 24 पदवीधर, सहा पदविकाधारक आहेत. तर 86 आमदार पाचवी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहेत, तर सात आमदारांनी स्वत:ला फक्त ‘साक्षर’ असं घोषित केल्याचं या रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे.