Skip to main content
Source
Mymahanagar
https://www.mymahanagar.com/desh-videsh/29-out-of-30-chief-ministers-of-the-country-have-assets-worth-crores-eknath-shinde-is-11th-in-the-list-msj/570184/
Author
My Mahanagar Team
Date
City
Mumbai

देशभरातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे नाव आघाडीवर आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्या क्रमांकावर असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या यादीत 11व्या स्थानी आहेत.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि इलेक्शन वॉचने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रांचे विश्लेषण केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. यात एकूण 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश आहेत. दिल्ली आणि पुद्दुचेरी या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्येही मुख्यमंत्री आहेत. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सध्या मुख्यमंत्री नाही. 30 मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर एडीआरला आढळले की 29 म्हणजे 97 टक्के मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत. या प्रत्येक मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती 33.96 कोटी आहे.

एडीआरच्या अहवालानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत आहेत. जगन मोहन यांच्याकडे 510 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे 163 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापाठोपाठ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा क्रमांक असून त्यांची संपत्ती 63 कोटींची आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी तीन कोटींची संपत्ती आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि हरियाणाचे मनोहर लाल यांच्याकडे प्रत्येकी एक कोटी रुपयांची संपत्ती आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. एडीआरच्या अहवालानुसार ममता बॅनर्जी यांच्याकडे 15 लाखांची संपत्ती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11व्या स्थानी

कोट्यधीश मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11व्या स्थानी असून त्यांच्याकडे 11 कोटी रुपयांपेक्षा अधिक (11,56,12,466 रुपये) मालमत्ता असून 3 कोटी रुपयांहून अधिक देणी आहेत. देणेकरी मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा क्रमांक तिसरा आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 61 लाखांहून अधिक आहे.

13 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे
देशभरातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 13 म्हणजे 43 टक्के मुख्यमंत्र्यांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण अशा गुन्ह्यांचाही समावेश आहे. गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा असून ते अजामीनपात्र गुन्हे आहेत, असे अहवालात म्हटले आहे.