सन २०१६ ते २०१८ या दोन आर्थिक वर्षांमध्ये सत्ताधारी भाजपला विविध व्यावसायिक घराण्यांकडून ९१५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. एकूण सहा राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक देणग्या या भाजपलाच मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांपेक्षा भाजपला मिळालेल्या देणग्यांची संख्या १६ पटीने जास्त आहे. याच काळात काँग्रेसला ५५.३६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.
निवडणुकीचे विश्लेषण करणाऱ्या एडीआर संस्थेने जारी केलेल्या आकड्यामधून ही माहिती समोर आली आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात त्यांना कोणीही २० हजार रुपयांपेक्षा जास्तीची देणगी दिलेली नाही. राष्ट्रीय पक्षांमध्ये कम्युनिस्ट पक्षाला सर्वात कमी देणग्या मिळाल्या आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सात लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. यापैकी चार लाख रुपये त्यांना कॉर्पोरेट्सकडून मिळाले आहेत.
राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण १२० कोटी रुपयांच्या देणग्यांचा स्रोत या पक्षांनी निवडणूक आयोगाला कळविलेला नाही. एकूण २.५९ कोटी रुपयांच्या देणग्यांमध्ये दात्याच्या पॅनकार्डचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. या सर्व राष्ट्रीय पक्षांना प्रुडेंट आणि सत्या इलेक्टोरल ट्रस्टने सर्वाधिक देणग्या दिल्या आहेत. त्या खालोखाल बांधकाम क्षेत्र, खाणउद्योग, आरोग्य, वित्तीय क्षेत्र, इंधन, शिक्षण, हॉटेल या क्षेत्रांतूनही राजकीय पक्षांना देणग्या मिळाल्या आहेत.