जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, उरण, पेण, मुरूड- जंजिरा, रोहा अष्टमी, श्रीवर्धन, महाड व माथेरान या नऊ नगरपालिकांची निवडणूक होत आहे. रविवारी मतदान होत असून काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा व शेतकरी काँगे्रस या प्रमुख पक्षांपैकी मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगडबरोबर कोकणातील रत्नागिरीमधील चार व सिंधुदुर्गमधील ४ नगरपालिकांचीही निवडणूक होत आहे.
राज्यातील इतर पालिकांप्रमाणेच कोकणातील निवडणुकांमध्येही सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची निवड करताना ज्येष्ठांबरोबर तरुणांनाही संधी दिली आहे. तीन जिल्ह्यांमध्ये २१ ते ४० वयोगटामधील ९४७ उमेदवार आहेत, तर ४० ते ८० वयोगटामधील तब्बल १००८ उमेदवार नशीब अजमावत आहेत. १०२५ पुरुष व ९४९ महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तीन जिल्ह्यांमध्ये तब्बल ४८ उमेदवार करोडपती आहेत. यामधील ३२ जण रायगड जिल्ह्यामधील असल्याचे निदर्शनास आले आहे. अलिबागमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत मधुसुदन नाईक यांच्याकडे ४५ कोटी १७ लाख रुपयांची संपत्ती आहे. कोकणातील सर्वात श्रीमंत व राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार असल्याचे सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र इलेक्शन वॉच व असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म अर्थात एडीआर या संस्थेने सर्व उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची माहिती तपासून हा निष्कर्ष काढला आहे. आपल्या उमेदवारांविषयी सर्व माहिती नागरिकांना असावी यासाठी संबंधित संस्थेच्या वतीने सर्व निवडणुकांचे सर्वेक्षण केले जाते.
१९५५ उमेदवारांची प्रतिज्ञापत्र तपासली
महाराष्ट्र इलेक्शन वॉच व असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) यांनी रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील १७ नगरपालिका निवडणुकांमधील तब्बल १९५५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे सर्वेक्षण करून आर्थिक व वयोगटाविषयी तपशील संकलित केला आहे. प्रत्येक उमेदवाराची माहिती संकलित करून नागरिकांच्या माहितीसाठी प्रसारित केली आहे.
उरणमध्ये सर्वाधिक उमेदवार
रायगड जिल्ह्यामध्ये १७० जागांसाठी ४४२ उमेदवार निवडणुकीच्या
रिंगणात आहेत. उरण नगरपालिकेच्या १८ जागांसाठी तब्बल ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंंगणात आहेत. खोपोलीमध्ये २९ प्रभागांसाठी ६३ व पेणमध्ये २१ प्रभागांसाठी ६२ उमदेवार निवडणूक लढवत आहेत.
सर्वात कमी उमेदवार मुरूड- जंजिरा निवडणुकीमध्ये आहेत. १७ जागांसाठी फक्त २८ उमेदवार रिंंगणात आहेत.