Skip to main content
Source
Lokmat
https://www.lokmat.com/national/national-parties-got-60-from-unknown-sources-82-percent-from-election-bonds-front-of-adr-report-a-a653/
Author
Online Lokmat
Date
City
New Delhi

२०२२-२३ या कालावधीत राष्ट्रीय पक्षांना मिळालेला तब्बल ५९.५७% निधी हा अज्ञात स्रोतांकडून मिळाला असून, यात निवडणूक रोख्यांचाही समावेश आहे. एकूण देणग्यांपैकी सुमारे ८२ टक्के रक्कम निवडणूक रोख्यांतून मिळाली होती, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संघटनेने अहवालात म्हटले आहे.

राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक आयोगाला सादर केलेले आपले ताळेबंद अहवाल व देणग्यांंसंदर्भातील दस्तावेज यांचे एडीआरने विश्लेषण केले. त्यानंतर एडीआरने आपल्या निष्कर्षात म्हटले आहे की, या पक्षांना मिळालेल्या बहुतांश देणग्यांचे स्रोत अज्ञात आहेत. २०२२-२३ साली राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या 
देणग्यांपैकी १८३२.८८ कोटी रुपयांचे स्रोत अज्ञात आहेत. 

मिळाल्या ३ हजार कोटींच्या एकूण देणग्या
२०२२-२३ या वर्षात राजकीय पक्षांना निवडणूक रोखे, कुपन विक्री आदी माध्यमांतून एकूण ३०७६.८८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. 
२० हजार रुपयांपेक्षा कमी देणगी देणाऱ्यांची नावे उघड करण्याचे बंधन सध्या राजकीय पक्षांवर नाही. निवडणूक रोखे घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचे सांगून 
सर्वोच्च न्यायालयाने आता ती योजनाच रद्दबातल केली आहे.

अज्ञात स्रोतांतून निधी -
अज्ञात स्रोतांतून १८३२ कोटी ५८.५७% 
ज्ञात स्त्रोतांकडून ८५० कोटी २७.४६% 
इतर स्त्रोतांतून ३९३ कोटी १२.७९% 


कोणत्या पक्षांना देणग्या मिळाल्या?
८२.४२ टक्के म्हणजे १,५१० कोटी रुपयांची रक्कम निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पक्षांना मिळाली आहे. एडीआरने भाजप, काँग्रेस, माकप, बसप, आप, एनपीईपी या पक्षांचे ताळेबंद व देणग्यांबाबतचे दस्तऐवज यातील माहितीचे विश्लेषण केले.

१९ हजार कोटी अज्ञात स्त्रोतांकडून...
- २००४-२००५ ते २०२२-२३ दरम्यान सर्व राष्ट्रीय पक्षांनी अज्ञात स्त्रोतांकडून १९,०८३ कोटी रुपये जमा केले आहेत. 
- २०२२-२३ दरम्यान भाजपने अज्ञान स्त्रोतांकडून १४०० कोटी रुपये देणगी मिळविली जी सर्व राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत ७६% अधिक आहे.
- भाजपचे उत्पन्न इतर ५ राष्ट्रीय पक्षांच्या अज्ञात स्त्रोतांच्या तुलनेत ९३७ कोटींपेक्षा अधिक आहे.