Skip to main content
Source
tv9marathi
https://www.tv9marathi.com/politics/75-percent-ministers-in-maharashtra-face-criminal-cases-adr-au29-781476.html
Author
भीमराव गवळी
Date
City
Mumbai

Maharashtra Government : एडीआरच्या रिपोर्टनुसार, मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती सर्वाधिक आहे. त्यांच्याकडे 441.65 कोटीची संपत्ती आहे. तर सर्वात कमी संपत्ती पैठणमधून विजयी झालेले संदीपान भुमरे यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे केवळ 2.92 कोटी रुपयाची संपत्ती आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार (Maharashtra Government) आल्यानंतर अखेर 39 दिवसानंतर राज्याचं मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) झाला आहे. या विस्तारात शिंदे गटाकडून 9 आणि भाजपकडून (bjp) 9 अशा 18 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिंदे सरकारमधील मंत्र्यांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. मात्र, शिंदे सरकारमधील 20 पैकी 15 मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत. तर 40 टक्के म्हणजे 8 मंत्री केवळ इयत्ता 10 वी ते 12 पर्यंतच शिकलेले आहेत. त्यामुळे शिंदे यांना या मंत्र्यांना घेऊन राज्याचा कारभार हाकावा लागणार आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात ही माहिती दिली आहे. राज्यातील 75 टक्के मंत्र्यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत. या मंत्र्यांनीच ही माहिती आपल्या निवडणूक शपथपत्रात दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 39 दिवसानंतर 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पकडून राज्यातील मंत्र्यांची संख्या 20 झाली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने 2019च्या विधानसभा निवडणुकीत मंत्र्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून त्यातून हे निष्कर्ष काढले आहेत.

13 मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्हे

या विश्लेषणानुसार, 15 (75 टक्के) मंत्र्यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत. त्यातील 13 (65 टक्के) मंत्र्यांच्या विरोधातील गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. विशेष म्हणजे शिंदे सरकारमधील सर्व मंत्री करोडपती आहेत. त्यांच्या संपत्तीचं मूल्य सरासरी 47.45 कोटी एवढं आहे.

लोढा सर्वाधिक श्रीमंत

एडीआरच्या रिपोर्टनुसार, मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती सर्वाधिक आहे. त्यांच्याकडे 441.65 कोटीची संपत्ती आहे. तर सर्वात कमी संपत्ती पैठणमधून विजयी झालेले संदीपान भुमरे यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे केवळ 2.92 कोटी रुपयाची संपत्ती आहे. शिंदे सरकारमध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही.

एकाकडेच डिप्लोमा

शिंदे सरकारमधील 8 (40 टक्के) मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी ते 12 वी एवढी आहे. तर 11 (55 टक्के) मंत्र्यांनी पदवीपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेलं आहे. एका मंत्र्याकडे डिप्लोमा आहे.