Skip to main content
Date

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला रंग चढत असताना आता मतदारांना आपल्या कवेत ओढून घेण्यासाठी उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू होणार आहे. भाजपप्रणित विद्यमान सरकारच आपली सत्ता अबाधित राखणार की राहुल-प्रियांकाच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस मुसंडी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच आता वेगवेगळी सर्व्हे आणि निरीक्षणे समोर येत असून त्यातूनही काही प्रमाणात चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. एडीआर (असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स) च्या सर्वेक्षणानुसार यंदाच्या निवडणुकीतही विविध सोयी-सवलतींसह पैसा आणि दारूभोवतीच मते फिरण्याची चिन्हे आहेत.

‘एडीआर’ने अलिकडेच देशपातळीवर केलेल्या सर्वेक्षणातून मतदारांच्या कलाबाबत अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. त्यानुसार 41.34 टक्के लोकांनी पैसा, दारू आणि विविध सोयी-सुविधांचा वर्षाव हे मते पदरात पाडून घेण्यासाठी सर्वात मोठे माध्यम ठरणार असल्याचे म्हटले आहे. 2.7 लाखांहून अधिक लोकांसह राष्ट्रव्यापी सर्वेक्षणातून ‘एडीआर’ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. एडीआरने जारी केलेले हे तिसरे अखिल भारतीय सर्वेक्षण आहे. या सर्वेक्षणात 534 लोकसभा मतदारसंघातील एकूण 2 लाख 73 हजार 487 लोक सहभागी झाले. या सर्वेक्षणात 97.86 टक्के लोकांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवू नये, असे मत नोंदवले. तर, 35.89 टक्के मतदारांनी पूर्वी प्रभावी कामगिरी केलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराला मत देण्यास काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले.

रोजगाराच्या संधी आणि उत्तम आरोग्य सेवा देणाऱया उमेदवार किंवा पक्षाच्या पाठीशी राहण्याचे मतही बहुतांश मतदारांनी व्यक्त केले. चांगल्या रोजगार संधींबद्दल मतदारांनी 2.15 रेटिंग दिले. तर, चांगल्या आरोग्य सेवेला 2.35 रेटिंग मिळाले. शेतीसाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी 2.18 आणि कृषी-कर्जाची उपलब्धतेसाठी 2.15 असे मूल्यांकन करण्यात आले आहे.

पायाभूत सुविधांबाबतही मतदार जागरुक

विविध पायाभूत सुविधांच्या उत्तम दर्जाकडेही मतदार गंभीरपणे पाहत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (2.58 टक्के), घरगुती वापरासाठी वीज (2.53), पिण्याचे पाणी (2.52), जल-वायू प्रदुषणाकडे दुर्लक्ष (2.51), महिलांचे सक्षमीकरण व सुरक्षा (2.48), भ्रष्टाचार निर्मूलन (1.37) आणि दहशतवाद (1.15) असा प्राधान्यक्रम दिसून आला.

 

 

मतदारांचे प्राधान्य कशाला ?

रोजगाराच्या संधी            46.80 टक्के

उत्तम आरोग्यसेवा            34.60 टक्के

पिण्याचे पाणी     30.50 टक्के

चांगले रस्ते-मार्ग 28.34 टक्के

सार्वजनिक वाहतूक          27.35 टक्के