Skip to main content
Source
दिव्या मराठी
https://divyamarathi.bhaskar.com/national/news/adr-report-rich-cm-india-jagan-mohan-reddy-eknath-shinde-mamata-banerjee-131155838.html
Date

देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याची बाब असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या ताज्या अहलातून समोर आली आहे. या यादीनुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या 30 मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या शपथ पत्रांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

शिंदेंकडे 11 कोटींची संपत्ती, 18 गुन्हे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 कोटींची संपत्ती आहे. शिंदे यांच्यावर 3.74 कोटींचे कर्जही आहे. या अहवालात एकनाथ शिंदे यांचे शिक्षण दहावी तर व्यवसाय हा कंत्राटदार असा दाखवण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंवर एकूण 18 गुन्ह्यांची नोंद असून यात एका गंभीर गुन्ह्याचा समावेश आहे.

शिंदे यांच्याकडे 11 कोटींची संपत्ती असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती 33.96 कोटी

एडीआरला या विश्लेषणात 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे दिसून आले आहे. यादीच्या विश्लेषणानुसार मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ही 33.96 कोटी इतकी आहे.

पेमा खांडू दुसऱ्या क्रमांकावर

यादीत 510 कोटींच्या संपत्तीसह जगनमोहन रेड्डी सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहे. त्यांच्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडूंचा क्रमांक येतो. ते 163 कोटींच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 63 कोटींच्या संपत्तीसह नवीन पटनायक तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे 3 कोटींची संपत्ती आहे. तर केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन आणि हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर यांच्याकडे प्रत्येकी 1 कोटींची संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी 15 लाखांची संपत्ती आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी

30 पैकी 13 मुख्यमंत्र्यांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात हत्या, हत्येचा प्रयत्न व अपहरणासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेसह अजामीनपात्र गुन्ह्यांना अहवालात गंभीर गुन्हे म्हटले गेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर एका गंभीर गुन्ह्यासह 18 गुन्ह्यांची नोंद आहे.