Skip to main content
Source
सरकारनामा
Author
Rajanand More
Date
City
New Delhi

Election Commission of India ADR Maharashtra : असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जाहीर करण्यात आलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून वाद निर्माण झाला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रत्येक टप्प्यानंतर काही दिवसांनी अंतिम टक्केवारी जाहीर केली जात होती. त्यावरून विरोधकांकडून वारंवार आक्षेप घेण्यात आला. आता असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेच्या दाव्यानंतर देशात तब्बल 5 लाख 89 हजार मतांचा घोळ झाल्याचे समोर आले आहे.

एडीआरच्या दाव्यानुसार, महाराष्ट्रातही 40 हजारांहून अधिक मतांचा घोळ आहे. लोकसभा निवडणुकीत 362 मतदारसंघात एकूण 5,54,598 मतांची मोजणी झालीच नाही. तर 176 मतदारसंघात एकूण मतदानाच्या 35 हजार मते अधिक मोजली गेली. दरम्यान, याबाबत अद्याप आयोगाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ADR Report

एडीआरच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ईव्हीएममध्ये पडलेली मते, त्यांच्या मोजणीतील अंतर, मतदानानंतर काही दिवसानंतर अंतिम टक्केवारीत झालेली वाढ, बूथनुसार झालेले मतदान, मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात झालेला विलंब याबाबत आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे एडीआरचे संस्थापक जगदीप छोकर यांनी म्हटले आहे.

देशात 538 मतदारसंघात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणीमध्ये विसंगती आढळून आलेली आहे. 2019 मध्येही अशीच विसंगती होती. हा आकडा तब्बल 7,39,104 एवढा होता. सहा मतदारसंघांमध्ये तर विजयी उमेदवाराचे मताधिक्य हे मतांच्या मोजणी आढळलेल्या विसंगतीपेक्षा कमी होते.

ADR Report

महाराष्ट्रात काय घडलं?

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी 35 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानापैकी 38,710 मतांची मोजणी कमी झालेली आहे. तर 13 मतदारसंघांमध्ये 1642 मते अधिक मोजली गेली आहेत. त्यानुसार एकूण 40 हजार 352 मतांची विसंगती आढळून आली आहे.

वादग्रस्त ठरलेल्या मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातही एकूण मतदानापैकी दोन मते अधिकची मोजण्यात आली आहेत. या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी झाले आहेत. याप्रकरणी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.