Source: 
Maharashtra Times
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5113468.cms
Author: 
जयंत होवाळ
Date: 
12.10.2009
City: 
Mumbai

प्रत्येक निवडणुकीत लोकप्रतिनिधी कोट्यवधींची झेप घेतात, यात आता काही नावीन्य राहिलेले नाही. पण कुणा लोकप्रतिनिधींचा बँक बॅलन्स घसरलाय असं कोणी सांगितलं तर सांगणाऱ्यालाच वेड्यात काढलं जाईल. पण यंदाच्या निवडणुकीत आठ उमेदवारांनी आम्हाला 'घाटा' झालाय असं संपत्तीचं प्रतिज्ञापत्र सादर करून धक्का दिलाय! मात्र संपत्तीच्या बाबतीत पाच आमदारांनी गरूडझेप घेतली आहे. असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक राइट्सच्या नॅशनल इलेक्शन वॉचने उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रावरून हा अहवाल तयार केला आहे. 

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मिरवणुकीच्या दिशेने चप्पल भिरकावणारे लोह्याचे प्रतापराव चिखलीकर यांची संपत्ती २००४ साली ९० लाख ३८ हजार ९३२ होती. चालू वर्षापर्यंत या संपत्तीत त्यांना तीन हजार ६४५ रुपयांची घट आली आहे. महसुलातील आवक घटल्याचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीचे पुसदचे आमदार मनोहर नाईक यांना बसला आहे. त्यांना ७० लाख ९१ हजार ५३३ रूपयांची घट आली आहे. त्यांची संपत्ती पाच कोटी ९६ लाख ५४ हजार १२४ वरून पाच कोटी २५ लाख ६२ हजार ५९१ रुपयांवर आली आहे. ठाण्यातील अपक्ष उमेदवार एकनाथ शिंदे यांची संपत्ती तर, २० लाख ५ हजार २०० रुपयांवरून एकदम एक लाख ६६ हजार ५६४ रुपयांवर आल्याचा दावा त्यांच्या प्रतिज्ञापत्रात आहे. 

काँग्रेसचे आवीर्चे अमर काळे यांची संपत्ती ५५ लाख ९३ हजार ४३७ रुपयांवरून ३९ लाख १३ हजार ८१८ वर आली. शिवसेनेचे वाशीममधील राजेंद पटणी यांची संपत्ती दोन कोटी ७२ लाख १९ हजार ८५५ होती. ती दोन कोटी ५६ लाख ४६ हजार ६९५ पर्यंत घसरली आहे. मलकापूरचे भाजपचे आमदार चैनसुख संचेती बँक बॅलन्स १५ लाख ३६ हजार ९०६ रुपये असा घसरला आहे. राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार वल्लभ बेनके यांना १४ लाख ६९ हजार ६४२ रुपयांची झळ बसली असून काँग्रेसचे अक्कलकुवाचे आमदार के. के. पडवी यांना ५ लाखांचा फटका बसला आहे! 

अबब... किती फुगला बँक बॅलन्स? 
दुसरीकडे बँक बॅलन्स गलेलठ्ठ झालेल्या पाच टॉप आमदारांमध्ये काँग्रेसचे तीन, शिवसेनेचा एक तर एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे. अपक्ष आमदार विलास लांडे यांच्या संपत्तीतील वाढीचा वेग तर गिनीज बुकात नोंदवावा लागेल. ७१ लाख ४१ हजार ५९५ रुपयांवरून अवघ्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती २२ कोटी ६५ लाख ९६ हजार ९५८ वर गेली आहे. म्हणजे ३,०७३ टक्के वाढ झाली आहे. जळगावचे शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांची संपत्ती २६ कोटी ३९ लाख ३५ हजार ३१ रुपये होती. हा आकडा ७९ कोटी १२ लाख १६ हजार ९६४ वर गेला आहे. काँग्रेसचे जळगावचे आमदार राजेंद दर्डा यांची संपत्ती सहा कोटी ३३ लाख २६ हजारावरून ३२ कोटी १७ लाख ७७ हजारावर पोहोचली. काँग्रेसचे विनायक निम्हण एक कोटी ६ लाख ५२ हजारावरून १८ कोटीवर गेले आहेत. याच पक्षाचे वामनराव बोडीर्कर यांनी चार कोटी वरून २७ कोटी वर उडी घेतली आहे. 

© Association for Democratic Reforms
Privacy And Terms Of Use
Donation Payment Method