देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने सोमवारी जारी केलेल्या अहवालानुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे 931 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या फक्त 15 लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. अहवालात असे म्हटले आहे की प्रत्येक राज्य विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता 52.59 कोटी रुपये आहे.
या सर्वेक्षणातून देशातील मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता आणि दायित्वे समोर आली आहेत. भारताचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न किंवा 2023-2024 साठी NNI अंदाजे 1,85,854 रुपये होते. तर मुख्यमंत्र्यांचे स्वतःचे सरासरी उत्पन्न 13,64,310 रुपये आहे, जे भारताच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या 7.3 पट आहे. 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 1,630 कोटी रुपये आहे.
चंद्राबाबू नायडूंनंतर, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू हे 332 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. या यादीत कर्नाटकचे सिद्धरामय्या हे 51 कोटी रुपयांहून अधिक संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे 55 लाख रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकाचे गरीब मुख्यमंत्री आहेत आणि 118 कोटी रुपयांच्या संपत्तीसह पिनाराई विजयन सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
खांडू यांच्यावर सर्वाधिक 180 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या अहवालात सिद्धरामय्या यांच्यावर 23 कोटी आणि नायडू यांच्यावर 10 कोटींहून अधिकचे कर्ज असल्याचे म्हटले आहे. 13 (42 टक्के) मुख्यमंत्र्यांनी स्वत:वर फौजदारी खटले जाहीर केले आहेत. तर 10 (32 टक्के) जणांनी खुनाचा प्रयत्न, अपहरण, लाचखोरी आणि गुन्हेगारी धमकावण्याशी संबंधित गंभीर गुन्हेगारी प्रकरणे घोषित केली आहेत. 31 मुख्यमंत्र्यांपैकी फक्त दोन महिला मुख्यमंत्री आहेत, ज्यात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि दिल्लीच्या अतिशी यांचा समावेश होतो.
