Skip to main content
Source
Dainik Prabhat
Author
Rushikesh Jangam
Date
City
New Delhi

आंध्रप्रदेशची धुरा सांभाळणारे एन.चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. ते तब्बल ९३१ कोटी रूपयांच्या मालमत्तेचे धनी आहेत. तर, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वांत कमी संपत्ती आहे. त्यांच्या नावे अवघी १५ लाख रूपयांची संपत्ती आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने सोमवारी एक अहवाल जारी केला. त्यामध्ये देशातील विद्यमान ३१ मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेशी संबंधित माहिती देण्यात आली. त्यानुसार, सर्व मुख्यमंत्र्यांच्या नावे मिळून १ हजार ६३० कोटी रूपयांची मालमत्ता आहे.

 

म्हणजेच, एकट्या चंद्राबाबूंकडे निम्म्यापेक्षा अधिक मालमत्ता आहे. एकूण मालमत्तेचा विचार करता मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता ५२.५९ कोटी रूपये इतकी भरते. देशाचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न सुमारे १ लाख ८५ हजार ८५४ रूपये आहे. त्यापेक्षा ७.३ पट अधिक मुख्यमंत्र्यांचे सरासरी स्वयंउत्पन्न आहे. ते १३ लाख ६४ हजार ३१० रूपये इतके नोंदले गेले आहे.

अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू श्रीमंतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नावावर ३३२ कोटी रूपयांची मालमत्ता आहे. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आहेत.

 

त्यांच्याकडे ५१ कोटी रूपयांची संपत्ती आहे. खांडू यांच्यावर सर्वांधिक १८० कोटी रूपयांचे कर्ज आहे. त्याखालोखाल सिद्धरामय्या यांना २३ कोटी रूपयांची देणी द्यायची आहेत. चंद्राबाबूंवर १० कोटी रूपयांपेक्षा अधिक कर्ज आहे.

 

सर्वांत कमी संपत्ती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये ममतांनंतर जम्मू-काश्‍मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या नावे ५५ लाख रूपयांची संपत्ती आहे. कमी संपत्तीबाबत तिसऱ्या क्रमाकांवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आहेत. त्यांच्याकडे १ कोटी १८ लाख रूपयांची संपत्ती आहे.

देशातील ४२ टक्के म्हणजे १३ मुख्यमंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ३२ टक्के म्हणजे १० मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न, अपहरण, लाचखोरी यांसारखे आरोप आहेत. देशातील ३१ पैकी केवळ २ मुख्यमंत्री महिला आहेत. त्यामध्ये ममता आणि आतिशी (दिल्ली) यांचा समावेश आहे.


abc