Skip to main content
Source
Esakal
Author
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था
Date
City
New Delhi

देशातील सर्व ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री कोट्यधीश असून प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडे सरासरी ५२ कोटी रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता आहे. यातील आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे अब्जाधीश आहेत.

त्या तुलनेत ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), ओमर अब्दुल्ला (जम्मू-काश्मीर) आणि पिनाराई विजयन (केरळ) हे अल्प संपत्ती असलेले मुख्यमंत्री आहेत. ममता बॅनर्जींची मालमत्ता केवळ १५ लाख रुपये आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉचने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३१ विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढला आहे. ही आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी मागील निवडणूक लढण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून घेण्यात आली आहे. दरम्यान, १३ मुख्यमंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यापैकी १० मुख्यमंत्र्यांवर हत्येचा प्रयत्न, अपहरण, लाचखोरी यासारखे गंभीर गुन्हे असल्याचे एडीआरने म्हटले आहे.

एडीआरच्या आकडेवारीनुसार सर्व ३१ मुख्यमंत्र्यांची एकूण मालमत्ता १६३० कोटी रुपयांची आहे. तर प्रती मुख्यमंत्री सरासरी मालमत्ता ५२.५९ कोटी रुपयांची आहे. त्यात स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे देशातील हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांची स्थावर, जंगम मालमत्ता तब्बल ९३१ कोटी रुपयांची आहे.

त्याखालोखाल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा क्रमांक आहे. पेमा खांडू यांची मालमत्ता ३३२ कोटी रुपयांची तर सिद्धरामय्या यांची मालमत्ता ५३ कोटी रुपयांची आहे. अर्थात, तिन्ही मुख्यमंत्र्यांवर कर्जही तेवढ्याच मोठ्या रकमेचे असल्याचेही एडीआरचे म्हणणे आहे.

तुलनेने कमी श्रीमंत मुख्यमंत्री

  • पिनाराई विजयन(केरळ) एक कोटी रुपये
  • ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) एकूण मालमत्ता १५.३८ लाख रुपये (स्थावर मालमत्ता त्यांच्या मालकीची नाही)
  • उमर अब्दुल्ला (जम्मू काश्मीर) ५५ लाख रुपये
  • एक कोटी ते १० कोटी रुपयांची मालमत्ता असलेले मुख्यमंत्री १७
  • ११ कोटी ते ५० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता असलेले मुख्यमंत्री ९

मुख्यमंत्री फडणवीस १३ कोटीचे मालक

एडीआरच्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मालमत्ता १३.२७ कोटी रुपये असून सामाजिक कार्य व शेती व्यवसाय असलेल्या फडणवीस यांचे उत्पन्न ३८.७३ लाख रुपये आहे.


abc