केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला मोलाचा पाठिंबा देणारा आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पक्ष (टीडीपी) २०२४-२५च्या आर्थिक वर्षात देशातील सर्वाधिक श्रीमंत प्रादेशिक पक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) ताज्या अहवालानुसार चंद्राबाबू नायडू यांच्या या पक्षाचे घोषित उत्पन्न तब्बल २२८.३१ कोटी रुपये आहे. राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना वगळता शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष मिळून चारही पक्षांनी आपले आर्थिक व्यवहार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची तसदी अद्याप घेतलेली नसल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. निवडणूक आयोगाकडे ३६ प्रादेशिक पक्षांनी सादर करण्यात आलेल्या लेखा परीक्षण अहवालांचे विश्लेषण केल्यावर आढळलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात देशातील प्रादेशिक पक्षांचे एकत्रित उत्पन्न ११९२.९४ कोटी रुपये आहे व त्यातील अव्वल पाच पक्षांचे उत्पन्न तब्बल ८२१.८६ कोटी रुपये (एकूण उत्पन्नाच्या ६९ टक्के) आहे. मात्र या पक्षांचे एकत्रित उत्पन्न त्याआधीच्या वर्षातील २४३६.१७ कोटी रुपयांवरून ११९२.९४ कोटी रुपयांवर आले असून त्यात ५१.५७ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र अण्णाद्रमुक (३७.२४ कोटी), मनसे (३७.७४ कोटी) व केंद्राला पाठिंबा देणाऱ्या आंध्रातील जनसेना (२४.५६ कोटी) यांचे या काळातील उत्पन्न वाढले आहे. वायएसआर काँग्रेसने ३४०.२० कोटी रुपये खर्च केले. ओडिशातील बिजू जनता दलाने २८८.४४ कोटी, तृणमूल काँग्रेसने २२७.५९कोटी आणि तेलंगणमधील बीआरएस ने १८०.५९ कोटी रुपयांचा खर्च केला. दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादींची चालढकल महाराष्ट्रातील शिवसेना, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांनी आपले लेखा परीक्षण अहवाल आद्यापही निवडणूक आयोगाकडे सादर केले नसल्याने ते अद्याप आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाहीत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मात्र ४१ दिवस विलंबाने का होईना, आपले आर्थिक व्यवहार आयोगाच्या संकेतस्थळावर टाकले आहेत.
