Skip to main content
Source
Marathi Freepress Journal
Date
City
New Delhi

राष्ट्रीय पक्षांचे आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचे उत्पन्न ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने गुरुवारी जाहीर केले. या अहवालानुसार, भाजपचे एकूण उत्पन्न ६,७६९.१५ कोटी आहे. ६ राष्ट्रीय पक्षांच्या उत्पन्नापैकी ८५% हिस्सा हा एकट्या भाजपजवळ आहे. भाजपचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ५५.९५% जास्त आहे आणि काँग्रेसपेक्षा सुमारे ७ पट अधिक आहे. देशातील ६ प्रमुख राष्ट्रीय पक्ष- भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-मार्क्सवादी), आम आदमी पक्ष (आप), बहुजन समाज पक्ष (बसपा) आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) यांचे एकूण उत्पन्न ७,९६० कोटी रुपये नोंदवले गेले. तर, मागील वर्षाच्या तुलनेत राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नात ४१.३५% वाढ झाली आहे. ‘आप’च्या उत्पन्नात वाढ, काँग्रेसचे घटले काँग्रेसचे उत्पन्न २०२३-२४ मध्ये १,२३०.७३ कोटी होते, जे २०२४-२५ मध्ये घटून ९१८.२९ कोटी झाले. हे मागील वर्षापेक्षा सुमारे २५.३९% कमी आहे. ‘आप’च्या उत्पन्नात ७३.२०% ने वाढ झाली आहे, तर बसपा आणि सीपीआय-एमच्या उत्पन्नात फारसा फरक नाही. काँग्रेसने १,१११ कोटी खर्च केले पैसे खर्च करण्याच्या बाबतीतही पक्षांमध्ये मोठा फरक दिसतो. सहा राष्ट्रीय पक्षांनी मिळून एकूण ४,७१०.२७ कोटी खर्च केले. त्यापैकी भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचार आणि प्रशासकीय कामांवर ३,३३५.३७ कोटी खर्च केले, जे त्याच्या एकूण उत्पन्नाच्या अर्धेही नाही. तर, काँग्रेसचे उत्पन्न ९१८.२९ कोटी होते. देणग्या, कूपनमधून सर्वाधिक कमाई अहवालानुसार, राजकीय पक्षांना मिळणाऱ्या पैशाचा मुख्य स्रोत देणग्या आहेत. राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नापैकी ८५ % पेक्षा जास्त म्हणजे सुमारे ६,७७२.५३ कोटी लोक आणि संस्थांकडून मिळालेल्या ऐच्छिक देणग्यांमधून आले. यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या एकूण उत्पन्नाचा सुमारे ९०.४८% हिस्सा देणग्यांमधून जमा केला. तर दुसरीकडे, काँग्रेसने देणग्यांव्यतिरिक्त कूपन विकूनही चांगली कमाई केली, ज्यामुळे पक्षाला सुमारे ३५० कोटी मिळाले, तर बसपाने आपल्या अहवालात देणग्यांमधून कोणतेही उत्पन्न दाखवलेले नाही. पक्षाची संपूर्ण कमाई बँक व्याज आणि इतर गुंतवणुकीतून झाल्याचे म्हटले आहे.


abc