Skip to main content
Source
सकाळ
Author
सकाळ वृत्तसेवा
Date
City
New Delhi

देशातील ३० पैकी १२ मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून, एकूण मुख्यमंत्र्यांमध्ये हे प्रमाण ४० टक्के आहे. यातील १० मुख्यमंत्र्यांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ (एडीआर) या संस्थेने सर्व मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे. त्या अहवालामध्ये ही माहिती स्पष्ट झाली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये ३० दिवसांपेक्षा जास्त काळ अटक करण्यात आली, तर त्यांना पदावरून हटविता येईल, अशा आशयाचे विधेयक केंद्र सरकारने आणले आहे. या पार्श्वभूमीवर, हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याविरोधात सर्वाधिक ८९ गुन्हे दाखल आहेत, तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याविरोधात ४७ गुन्हे दाखल आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात १९, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात १३, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात पाच गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुख्खू यांच्याविरोधात प्रत्येकी चार गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याविरोधात दोन, तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात एका गुन्ह्याची नोंद आहे.

चंद्राबाबू नायडू श्रीमंत मुख्यमंत्री

‘एडीआर’च्या अहवालामध्ये मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचेही विश्लेषण केले आहे. यामध्ये ९३१.८३ कोटी रुपये संपत्तीसह चंद्राबाबू नायडू पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे ३३२.५६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आहेत, त्यांच्याकडे ५१.९३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १३.२७ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

  • गुन्ह्यांची नोंद असणारे मुख्यमंत्री - १२
  • गंभीर गुन्ह्यांची नोंद असणारे मुख्यमंत्री - १०
  • अब्जाधीश मुख्यमंत्री- २
  • मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती - ५४.४२ कोटी रुपये

सर्वाधिक मुख्यमंत्री ५१ ते ६० वयोगटातील

वयोगट मुख्यमंत्री

  • ४१-५० - ८
  • ५१-६० - १२
  • ६१-७० - ४
  • ७१-८० - ६

abc