India Richest CM List: भारतामध्ये सध्या कार्यरत असलेल्या 30 मुख्यमंत्र्यांपैकी केवळ दोन सीएम अरबपती असल्याचे समोर आले आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांचं असेल. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात देशातील 27 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमधील मुख्यमंत्र्यांची मालमत्ता तपासण्यात आली. या सर्व मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता तब्बल 54.42 कोटी रुपये इतकी आहे.
कोण आहेत सर्वात श्रीमंत सीएम?
ADRच्या अहवालानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असून त्यांच्या मालमत्तेची एकूण किंमत 931 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू असून त्यांच्याकडे 332 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आहे. तर तिसऱ्या स्थानी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असून त्यांची संपत्ती 51 कोटी रुपयांहून अधिक आहे.
सर्वात कमी मालमतत्ता कोणाची?
संपत्तीच्या यादीत सर्वात खालच्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. त्यांच्या नावावर अवघी 15.38 लाख रुपयांचीच मालमत्ता आहे. दुसऱ्या क्रमांकावर जम्मू-काश्मीरचे उमर अब्दुल्ला असून त्यांच्याकडे 55 लाखांची मालमत्ता आहे. केरळचे पिनराई विजयन (1.18 कोटी), राजस्थानचे भजनलाल शर्मा (1.46 कोटी) हे देखील कमी मालमत्ता असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मालमत्ता किती?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती किती आहे हे जाणून घेऊयात. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या हलफनाम्यानुसार फडणवीस कुटुंबाकडे तब्बल 13 कोटी 27 लाख 47 हजार 728 रुपयांची मालमत्ता आहे.फडणवीस यांच्या वैयक्तिक नावावर 56 लाख 7 हजार 867 रुपयांची संपत्ती नमूद आहे. तर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सुमारे 6 कोटी 96 लाख 92 हजार 748 रुपयांच्या मालमत्तेच्या मालकिणी आहेत. त्याचप्रमाणे मुलगी दिविजा फडणवीस हिच्या नावावरही 10 लाख 22 हजार 113 रुपयांची चल संपत्ती असल्याचे कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे.
योगी आदित्यनाथ, नीतीश कुमार आणि इतर मुख्यमंत्रांची मालमत्ता किती?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे 1.54 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. बिहारचे नीतीश कुमार थोडेसे पुढे असून त्यांची मालमत्ता 1.64 कोटी रुपये आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि ओडिशाचे मोहन चरण माझी यांच्याकडे 1.97 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्याकडे 3.80 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
ADR चा सविस्तर खुलासा
ADRने मुख्यमंत्र्यांनी निवडणूक अर्ज करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही माहिती विश्लेषित केली आहे. सध्या मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे तेथील मुख्यमंत्र्यांचा समावेश या अहवालात करण्यात आलेला नाही.
